News

महिला दिन विशेष – ‘ती’च्या असण्याने आहे जगण्याला अर्थ…

तू आहेस म्हणुनी आहोत आम्ही सर्व, तुझ्या असण्यानेच आहे जगण्याल अर्थ! हे आजच्या दिवशी आपण आपल्या आजूबाजला असलेल्या स्त्रीयांना नक्कीच एकदा बोलून दाखवू. कारण, आज महिला दिन, बघायला गेले, तर हे उद्गार आपल्या तोंडातून रोज निघायला हवे. कारण जशी आपण देवाची पूजा करतो, देवाचे आभार मानतो; तसेच आपल्या सभोवतालच्या स्त्रियांसाठी देखील हे उद्गार बाहेर यायला हवे. एक स्त्री आई, पत्नी, सासू-सून आणि मुलगी जरी असली, तरी ती एक स्त्री आहे. तिच्याही काही आवडीनिवडी आहेत, तिलाही भावना आहेत, हे आपण बहुदा विसरून जातो.
‘कौतुकाची भुकेली ती, तिला घाला वावतेची माळा’
स्त्री नेहमी कौतुकाची भुकेली असते. सोन्याच्या भरगच्च किंमतीच्या दागिन्यांची सर ती तिच्या कौतुकात शोधत असते. स्वतःची सगळी नाती सांभाळताना तीचे असलेले अस्तित्व ती विसरून जाते. आज महिला दिनानिमित्त आपण तिच्यातील ‘स्त्री’ ला पुन्हा बाहेर काढूया. तिच्याशी गप्पा मारुया, तिला बोलते करूया. मुख्य म्हणजे तिचे कौतुक करूया, ती किती सुंदर आणि निर्मळ आहे, तिला याची जाणीव करून देऊया.
WOMEN-SAFTY?
महिलांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह

आज समाजात पाहायला गेले तर, महिलांच्या बाजूने सर्वकाही आहे, तिला मानाचे स्थान दिले जात आहे, असा बोभाटा जरी समाज करीत असला; तरी तितकीच तिची अवस्था वाईट आहे. कारण, स्त्री एक आणि समस्या अनेक; अशी गत आपल्या समाजात आहे. एकीकडे महिला उच्चपदावर कार्यरत आहे, तर दुसरीकडे विनयभंग, बलात्काराच्या दुर्दैवी घटना आपण रोज ऐकतो. आज महिला अनेक संकटे पार करून यशाच्या शिखरावर आहेत, तर दुसरीकडे त्याच यशासाठी तिला रात्री प्रवास करणे म्हणजे संकटांच्या भोवऱ्यात अडकण्यासारखे वाटत आहे. एका स्त्रीला समाज ‘हिमा दास’ म्हणून ओळखतो, तर दुसरीकडे स्त्री ‘निर्भया’ म्हणून भीती व्यक्त करतो. आज महिला दिन आपण मोठ्या थाटामटात साजरा करतो. सगळीकडे महिला दिनविशेष कार्यक्रम राबविले जातात, पेपरमध्ये आपण रकाने भरून महिलांची गोडगाथा वाचतो, रस्त्यावर मोठमोठे पोस्टर पहायला मिळतात, पण दुसरीकडे त्याच महिलांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह हे एकच उत्तर आपल्याकडे असते.

स्त्री ही भोगवस्तू नाही 
जशी आधी ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ हे सांगणे काळाची गरज होती, तसेच आता ‘स्त्रियांचा सन्मान केलाच पाहिजे’ हे सांगणे काळाची गरज बनली आहे. आज बघायला गेले तर, महिलांच्या प्रश्नांबाबत दुर्लक्षित करणे, त्यांचे महत्व समजून न घेणे या सगळ्यामुळे स्त्रियांची संख्या पुरुषांच्या अर्ध्यावर आली आहे. मुळात, माणूस हे विसरला आहे, की त्याला जन्म देणारी , त्याला या जगात आणणारी देखील एक बाईच आहे एक स्त्रीच आहे. भारतीय संस्कृतीत तर आपण देवीची पूजा करतो, तिला लक्ष्मी, पार्वती, दुर्गा म्हणून मान देतो आणि घराच्या गृहलक्ष्मीला आदर मान देखील देत नाही. तिला एक भोगवस्तू म्हणून बघितले जाते, तिचा वापर केला जात आहे. स्त्री ही भोगवस्तू नसून तिला देखील काही भावना आहेत हे समजत नाही.
women-freedom-महिला
कधी महिलेला सर्व बंधने तोडून, झुगारून खुलेपणाने वावरता येणार?
आपल्या भारतीय संस्कृतीत महिलांना विशेष सन्मान आणि महत्त्व दिले आहे. संस्कृतमध्ये एक श्लोक आहे  ‘यस्य पूज्यंते नार्यस्तु तत्र रमन्ते देवता:’ म्हणजे जिथे स्त्रीची पूजा केली जाते, तिथे देवता वास्तव्यास असतात. परंतु, सध्याच्या आधुनिक काळात दुसरीकडे नारींचा अपमान होत आहे. सारी दुनिया भले ही डिजिटल झाली, जग कितीही पुढे गेले तरी समाजाचा स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन काही बदलत नाही. आजची स्त्री साधी एकटी प्रवास करू शकत नाही. बातम्यांमध्ये आपण रोज महिलांच्या बाबतीत दुर्दैवी घटना ऐकत असतो. त्यामुळे महिला जरी सक्षम असली, तरी आपल्या समाजात वावरताना तिला अनेक संकटांना तोंड द्यावे लागते. आज कन्या, विवाहित, परितक्त्या महिला आहेत. पण, समाजाचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. अंगभर कपडे परिधान करून देखील तिच्याकडे वासनने पाहिले जाते. कोविडच्या काळात तोंडावर मास्क असून, देखील पुरुषांच्या नजरा बदलल्या नाहीत, हे किती लज्जास्पद आहे! नजरेतून शरीरावर झळकणारा स्त्रियांचा हा वनवास कधी थांबणार? कधी महिलेला सर्व बंधने तोडून, झुगारून खुलेपणाने वावरता येणार? ती कधी सुरक्षितता अनुभवणार? जेव्हा या सगळ्या प्रश्नांची सकारात्मक उत्तरे मिळतील, तेव्हा खऱ्या अर्थाने आपण महिलांचा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करू शकतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button