News

सोनाली शिंगटे – चाळीतल्या मुलीची राष्ट्रीय कबड्डीपटू बनण्याची प्रेरणादायी संघर्षगाथा

मुंबईतील एका गरीब कुटूंबातील सोनाली राष्ट्रीय पातळीवर आपलं नाव गाजवलं आपण आज त्याच लाल मातीतील वाघिणीचा संघर्ष पाहणार आहोत…

  •  हलाखीच्या परिस्थितीतून पुढे जात सोनालीने मिळवलेले हे यश नक्कीच आदर्शवत.
  •  क्रिकेट खेळण्याचे स्वप्न राहिले अपूर्ण
  •  फेडरेशन कप स्पर्धा सोनाली शिंगटे हिच्यासाठी टर्निंग पॉइंट
  •  आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी सोनालीची भारतीय संघात निवड
  •  राज्यातील सर्वोत्कृष्ट क्रीडा पुरस्कार ‘शिव छत्रपती पुरस्कार’ देऊन गौरव

कबड्डी म्हंटले, की शरीराची कसरत करणे खूप आवश्यक असते. शरीराच्या कसरती सोबतच बौद्धिक चातुर्य, दुर्दम्य इच्छाशक्ती आणि चपळपणा असणे देखील तितकेच आवश्यक असते. प्रचंड मेहनत घेत, या सगळ्या गोष्टी आत्मसात करत मुंबईतील एका गरीब कुटूंबातील मुलीने राष्ट्रीय पातळीवर आपले नाव नाव गाजवले. आज त्याच लाल मातीतील वाघिणीचा संघर्ष या लेखातून पाहणार आहोत. अत्यंत हलाखीची परिस्थिती असतानाही मनात कबड्डी खेळण्याची असलेल्या प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर मुंबईच्या सोनाली शिंगटे हीने तिचे स्वप्न पूर्ण केले. जेव्हा सोनालीने कब्बडीसाठी प्रशिक्षण सुरू केले. तेव्हा तिच्याकडे बूटही नव्हते आणि ते विकत घेण्याची तिच्या कुटुंबाची परिस्थितीही नव्हती. एकेकाळी बूट घेण्यासाठी देखील पैसे नसलेली सोनाली पुढे राष्ट्रीय कबड्डीपटू बनली.

sonali-shingate-best-kababdi-pattu

कुटुंबाच्या परिस्थितीमुळे क्रिकेट खेळण्याचे स्वप्न राहिले अपूर्ण –

सोनाली शिंगटे हिचा जन्म दिनांक २७ मे १९९५ रोजी मुंबईमधील लोअर परळ येथे झाला. सोनाली हिने आपले महाविद्यालयीन शिक्षण महर्षी दयानंद कॉलेजमध्ये पूर्ण केले. सोनाली हिला खरेतर लहानपणापासून क्रिकेटची आवड होती. मात्र, क्रिकेटमध्ये करियर म्हणजे भरपूर खर्च या अशा समजुतीमुळे तिचे क्रिकेट खेळण्याचे स्वप्न अपूर्णच राहिले. कॉलेजमध्ये असताना तिने कबड्डी खेळण्यास सुरुवात केली. त्यावेळी तेथील स्थानीय क्रीडा मंडळ, शिवशक्ती महिला संघ येथे राजेश पाडावे यांच्या मार्गदर्शनाखाली सोनाली हिने कबड्डीचे धडे गिरवायला सुरुवात केली. दररोज सकाळी कब्बडीचा सराव करून संध्याकाळी सोनाली सामना खेळण्यासाठी जात असे. तिच्या परिवारातील सदस्यांचे स्पष्ट म्हणणे होते, की खेळ एका बाजूला आणि शिक्षण एका बाजूला. अशा परिस्थितीत सोनाली खेळाचा सराव करून झाल्यानंतर उशीरा रात्री अभ्यासाला बसत असे. सोनाली हिचे वडील हे सुरक्षारक्षकाची नोकरी करत. तर, आई छोटेसे दुकान सांभाळत असे. अशा हलाखीच्या परिस्थितीतून पुढे जात, सोनालीने मिळवलेले हे यश नक्कीच आदर्शवत असे आहे.

हे हि वाचा – सालूमराडा थिमाक्का – 107 वर्षांची निसर्गाची आई

sonali-shingate-kabbadi-award

राष्ट्रीय पातळीवर उत्तम कामगिरी

काही वर्षांनंतर सोनाली शिंगटे यांना वेस्टर्न रेल्वेमध्ये नोकरी मिळाली. तिथे प्रशिक्षक गौतमी अरोसकर यांनी सोनालीला तिचे कौशल्य सुधारायला मदत केली. सोनाली शिंगटेसाठी ‘फेडरेशन कप’ स्पर्धा २०१८ मध्ये ‘टर्निंग पॉइंट’ ठरली. त्यावेळी सोनाली ‘इंडियन रेल्वे’ या संघाचा भाग होती. त्यावेळी ती इंडियन रेल्वे संघाकडून खेळत होती. त्या स्पर्धेत अंतिम सामन्यात इंडियन रेल्वेने हिमाचल प्रदेशच्या संघाचा पराभव केला होता. तिला ‘फेडरेशन कप’ या स्पर्धेच्या जोरावर भारतीय संघाच्या कॅम्पसाठी बोलावण्यात आले होते. आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी सोनालीची भारतीय संघात निवड झाली होती. भारतीय संघाने तेव्हा रौप्यपदकाला गवसणी घातली. त्यानंतर काठमांडूमध्ये झालेल्या २०१९ च्या दक्षिण आशियाई स्पर्धेत भारतीय कबड्डी संघाने सुवर्ण पदक पटकावले. या संघात सोनालीचाही समावेश होता. महाराष्ट्र सरकारने त्याची दखल घेऊन राज्यातील ‘शिव छत्रपती’ हा सर्वोत्कृष्ट क्रीडा पुरस्कार २०१९मध्ये देऊन गौरव केला. भारतात महिला कबड्डीला प्रोत्साहन देण्यासाठी पुरुषांच्या प्रो कबड्डी लीगच्या धर्तीवर महिलांसाठी देखील व्यावसायिक कबड्डी लीग स्पर्धा सुरू करावी, असे सोनालीचे म्हणणे आहे.

सोनालीने हलाखीच्या परिस्थितीतून पुढे जात मिळवलेले हे यश नक्कीच आदर्शवत असे आहे. तीची ही संघर्षगाथा निश्चितच कौतुकास्पद आणि प्रेरणादायी आहे.

-राकेश मोरे । प्रतिनिधी 

नवीन बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी, आमच्यासोबत ‘फेसबुकवर’ जोडून राहा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button