Mumbai

स्वतंत्र कला विद्यापीठासाठी बॉम्बे आर्ट सोसायटीने पुढाकार घ्यावा – मुख्यमंत्री

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कलर्स ऑफ इंडिपेंडन्स, 75 इयर्स ऑफ आर्ट या ऑनलाइन प्रदर्शनाचे उद्घाटन

bombay-art-society

मुंबई : राज्यात कलेसाठी स्वतंत्र विद्यापीठ असावे ही आपली सुरुवातीपासूनची इच्छा असून हे विद्यापीठ स्थापन करण्यासाठी दि बॉम्बे आर्ट सोसायटीने (Bombay Art Society) पुढाकार घ्यावा, त्यास शासन पूर्ण सहकार्य करेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे केले.

दि बॉम्बे आर्ट सोसायटी आयोजित कलर्स ऑफ इंडिपेंडन्स: 75 इयर्स ऑफ आर्ट या ऑनलाईन कला प्रदर्शनाचे उद्घाटन आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी भारतीय स्वातंत्र्य अशाच सुंदर रंगाने बहरत जावे अशी अपेक्षाही व्यक्त केली. स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी होत असताना दि बॉम्बे आर्ट सोसायटीचे नाव मुंबई आर्ट सोसायटी असं केलं जावे अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.

कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, दि बॉम्बे आर्ट सोसायटीचे (Bombay Art Society) अध्यक्ष राजेंद्र पाटील, उपाध्यक्ष रामदास फुटाणे, सचिव चंद्रजित यादव यांच्यासह विविध देशातील, भारताच्या विविध 29 राज्यातील आणि महाराष्ट्रातील कलाकार व इतर मान्यवर उपस्थित होते. या प्रदर्शनात चित्र, शिल्प, मुद्राचित्र, फोटोग्राफी, व्हिडिओ इन्स्टॉलेशन यासारख्या 5 कलाप्रकारातील 1645 कलाकृती सादर करण्यात आल्या आहेत. हे प्रदर्शन 15 ऑगस्ट ते 30 डिसेंबर 2021 या काळात ऑनलाईन पद्धतीने बॉम्बे आर्ट सोसायटीच्या संकेतस्थळावर पाहता येईल.

सोसायटीने ज्या दिग्गज कलाकारांच्या नावे पारितोषिके सुरु केली त्यातील काही कलावंतांना कलानगरमध्ये मला पाहायला मिळाले ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, कलाकार आपल्या कलेतून स्वत: आनंद घेतोच परंतु प्रेक्षकाकडून त्याला जेव्हा दाद मिळते तेव्हा त्याचे समाधान त्याला अधिक मिळते. मागील दीड वर्षांपासून कोरोनाचा सामना करताना कलाकारांची काही प्रमाणात कोंडी झाली असली तरी बॉम्बे आर्ट सोसायटीने देश विदेशातील कलाकारांसाठी ऑनलाईन व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याचा आपल्याला आनंद आहे.

आज बॉम्बे आर्ट सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी, रामदास फुटाणे यांनी आर्ट कौन्सिलची स्थापना असेल, अनुदान देणे असेल किंवा मालमत्ता करात सवलत देण्याचा विषय असेल त्या संदर्भात ज्या अपेक्षा व्यक्त केल्या त्यासाठी येत्या आठ दिवसात बैठक आयोजित करून निर्णय घेऊ. यासंदर्भात जे जे करणे शक्य आहे ते करण्याचा प्रयत्न करू असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

कलाकाराचे स्वत:चे एक विश्व असते, त्याला कधी लॉकडाऊन लागू शकत नाही असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, आपली कला कशा प्रकारे सादर करायची याचे त्याला स्वातंत्र्य असते, कारण क्रिएटिव्हीटीला कुठलीच बंधने नसतात आणि नसावीत. कलाकारांना त्यांची कलाकृती लोकांसमोर आणायला सहज सोपा मार्ग असावा असेही ते म्हणाले.

कार्यक्रमात सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या या ऑनलाईन प्रदर्शनाचे स्वरूप, सहभागी कलाकार, आणि त्याची वैशिष्ट्ये, सोसायटीतर्फे दिली जाणारी पारितोषिके याची माहिती दिली. उपाध्यक्ष रामदास फुटाणे यांनी आपल्या भाषणात एका कलाकाराच्या हस्ते या कला प्रदर्शनाचे उद्घाटन होत असल्याचा आनंद व्यक्त केला ते म्हणाले सोसायटीपुढे अनेक अडचणी आहेत, त्या दूर करणे गरजेचे आहे, इतर संस्थांप्रमाणे शासनाने या बॉम्बे आर्ट (Bombay Art Society) सोसायटीलाही अनुदान द्यावे.

PN NEWS चे टेलीग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

नवीन बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठीआमच्यासोबत ‘फेसबुकवर’ जोडून राहा

Get the Latest Marathi NewsMaharashtra News, and Live News Headlines  from Politics, Entertainment, Sports, Business, and all news from all cities of Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button