पुणे जिल्ह्यात 70 लाख कोविड लसीकरणाचा टप्पा पार – अधिकाधिक लोकांचे लसीकरण पूर्ण करण्याचा प्रयत्न : उपमुख्यमंत्री अजित पवार

महाराष्ट्र
  • टास्क फोर्स तज्ञांच्या मार्गदर्शनानुसारच शाळांबाबतचा निर्णय
  • ग्रामीण भागात धडक सर्वेक्षण मोहिमेंतर्गत 2 लाख 83 हजार 327 नमुना तपासणी पूर्ण
  • प्रत्येक तालुक्यात एक ऑक्सिजन प्लँट
  • खाजगी रुग्णालयातील लसींवर प्रशासनाचे नियंत्रण
  • तिसऱ्या लाटेची शक्यता गृहित धरुन प्रशासन सज्ज, नागरिकांनीही नियमांचे पालन करावे

deputy-cheif-minister-ajit-pawar-gives-pune-vaccination-update

पुणे : जिल्ह्यात कोवीड प्रतिबंधक लसीकरणाचा 70 लाखांचा टप्पा पार (Pune Vaccination Update) झाला आहे. ग्रामीण भागात धडक सर्वेक्षण मोहिमेंतर्गत 2 लाख 83 हजार 327 नमुना तपासणी करण्यात आली आहे. ग्रामीण कार्यक्षेत्रातील हॉटस्पॉट गावांमध्ये कोविडबाबत योग्य वर्तन जनजागृती, शोध चाचणी उपचार, कोविड केअर सेंटर, शासकीय योजना व कोविड लसीकरण या पाच कृतीदलाच्या माध्यमातून कोविडमुक्त गाव अभियानास सुरुवात करण्यात आल्याची माहिती  उपमुख्यमंत्री तथा पालकंमत्री अजित पवार यांनी आज दिली, तसेच टास्क फोर्सच्या मार्गदर्शनानुसारच शाळा सुरु करण्याबाबतचा निर्णय घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पुणे विधान भवनाच्या विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती व उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, गृहमंत्री दिलीप वळसे – पाटील, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, जि. प. अध्यक्षा निर्मला पानसरे, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ,  खासदार सुप्रिया सुळे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार ॲड. अशोक पवार, आमदार सुनील शेळके, आमदार सुनिल टिंगरे, आमदार सिध्दार्थ शिरोळे, तसेच विभागीय आयुक्त सौरभ राव, यशदाचे महासंचालक एस चोक्कलिंगम, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त राजेश पाटील, जिल्हाधिकारी डॉ .राजेश देशमुख, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, आरोग्य विभागाचे निवृत्त महासंचालक डॉ.सुभाष साळुंखे आदिंसह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार (Pune Vaccination Update) म्हणाले, जिल्ह्यात मागील चार आठवड्यांमध्ये रुग्णसंख्या कमी होताना दिसून येत आहे.  कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी प्रशासन तयारी करत असून नागरिकांनीही नियमांचे पालन करावे. पुणे मनपामध्ये 10, पिंपरी चिंचवडमध्ये 3, पुणे ग्रामीण मध्ये 12 ऑक्सिजन प्लँट कार्यान्वित झाले आहेत. संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने अपेक्षीत ऑक्सिजनची गरज लक्षात घेता  जिल्हा ऑक्सिजनबाबत स्वयंपूर्ण करण्यात येत आहे.

जिल्ह्यात पहिल्या डोस आधी दुसऱ्या डोसला प्राधान्य देण्यात येत आहे. जिल्ह्यात लसीकरणाचा वेग समाधानकारक आहे. जवळपास कोवीड लसीकरणाचा 70 लाखांचा टप्पा पूर्ण केला आहे. जास्तीत जास्त लस उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न सूरु आहेत. खाजगी रुग्णालय लसीकरणावरही शासनाचे नियंत्रण आहे. तसेच खाजगी रुग्णालयाच्या वैद्यकीय देयकांचे लेखा परिक्षणही वेळोवेळी सुरु आहे. रुग्णसंख्या कमी होत असली तरी चाचण्यांचे प्रमाण कमी केलेले नाही.

सुपर स्प्रेडर सर्वेक्षण नमुना तपासणीमध्ये एम. आय. डी. सी. कारखाने क्षेत्रातील कामगार व मजूर, बँक कर्मचारी तसेच सामाजिक पदाधिकारी व कार्यकर्ते यांची आरटीपीसीआर नमुना तपासणी करण्यात येत आहे. धडक सर्वेक्षण मोहिमेमुळे हॉटस्पॉट गावांची संख्या 109 वरुन 95 पर्यंत कमी झाली आहे.  ग्रामीण भागातील हॉटस्पॉट गावांवरही विशेष लक्ष देण्यात येत आहे. शाळा सुरु करण्याबाबत टास्क फोर्सचे तज्ञ जे मार्गदर्शन देतील त्यानुसारच निर्णय घेणार असल्याचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, खासदार सुप्रिया सुळे, खासदार श्रीरंग बारणे तसेच अन्य लोकप्रतिनिधींनीही महत्त्वाच्या सूचना केल्या. डॉ. सुभाष साळुंके म्हणाले, लहान मुलांच्या पावसाळ्यातील आजारांकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. शाळा सुरु करण्यापूर्वी कुटुंबातील व्यक्तींचे जास्तीत जास्त लसीकरण करुन घेणे आवश्यक असल्याचेही डॉ. साळुंके यांनी सांगितले.

विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात जिल्ह्यातील कोरोनाचा रुग्णदर, प्रशासनाच्यावतीने जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना, नागरिकांची नमुना तपासणी, बाधित रुग्ण, रुग्णालयीन व्यवस्थापन, लसीकरण सद्यस्थिती, म्युकरमायकोसिसचा रुग्णदर, मृत्युदर, तिसऱ्या लाटेच्या तयारीच्या दृष्टीने ऑक्सिजन प्लँटची सद्यस्थिती बाबतची माहिती सादरीकरणाद्वारे दिली.

पुणे मनपा आयुक्त (Pune Vaccination Update) विक्रम कुमार व पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त राजेश पाटील यांनी महानगरपालिकेच्यावतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनाबाबत माहिती दिली. जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख व जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी ग्रामीण भागातील कोरोना रुग्ण स्थितीबाबत व उपाययोजनेबाबत माहिती दिली. बैठकीला विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *