लीडस् : इंग्लंडमध्ये रंगत असलेली भारत आणि इंग्लंड (India Vs England Third Test) मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यास आजपासून सुरूवात होणार आहे. हेडिंग्लेच्या लीडस् मैदानावर कसोटी मालिकेत 2-0 अशी आघाडी घेण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल.
टीम इंडियाचा खेळ दर सामन्यानुसार उंचावत असला तरी खराब फॉर्मचा सामना करत असलेला कर्णधार विराट कोहलीचा प्रयत्न मोठी खेळी करण्याचा असेल. विराटने आपले शेवटचे आंतरराष्ट्रीय शतक हे नोव्हेंबर 2019 मध्ये झळकावले होते. यानंतर गेले अनेक महिने तो फॉर्मशी झुंजत आहे. त्यामुळे तिसर्या कसोटी (India Vs England Third Test) सामन्यात तो हि उणीव भरून काढेल, अशी अपेक्षा आहे.
चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांचा फॉर्म भारताच्या दृष्टीने चिंतेचा विषय बनला होता, मात्र या दोघांनीही लॉर्डस् कसोटीच्या चौथ्या दिवशी जवळपास 50 षटके फलंदाजी करत फॉर्ममध्ये येण्याचे संकेत दिले आहेत. या दोघांच्या खेळीमुळे सामना हा पाचव्या दिवसापर्यंत गेला आणि भारतीय गोलंदाजांनी चांगली कामगिरी करत विजय मिळवून दिला.
सलामी फलंदाज रोहित शर्मा आणि के. एल. राहुल चांगल्या फॉर्मात आहेत. यासोबत रिषभ पंत आपल्या शैलीत फलंदाजी करत आहे, तर रवींद्र जडेजाने सातव्या क्रमांकावर चांगली भूमिका पार पाडली. हेडिंग्ले येथील परिस्थिती ही जलदगती गोलंदाजांना अनुकूल असून भारतीय संघ पुन्हा एकदा चार जलदगती गोलंदाजांसह सामन्यात उतरणार आहे.
असे आहेत अंतिम संघ :
भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रिषभ पंत (विकेटकिपर), रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, के. एल. राहुल
इंग्लंड : जो रूट (कर्णधार), मोईन अली, जेम्स अँडरसन, जोनाथन बेयरस्टो, रोरी बर्न्स, जोस बटलर (विकेटकिपर), सॅम कुरेन, हसीब हमीद, डेव्हिड मलान, क्रेग ओवरटन, ओली रॉबिन्सन.