मुंबई : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेमध्ये महाराष्ट्राने आज पुन्हा एकदा दमदार कामगिरी करीत दिवसभरात 10 लाख 96 हजार नागरिकांना लस (Vaccination Record in Maharashtra) देण्याचा विक्रम आपल्या नावावर नोंदविला आहे. एकाच दिवशी सुमारे अकरा लाखाच्या आसपास नागरिकांना लसीकरण करून आरोग्य विभागाने केलेल्या अतुलनीय कामाची दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी घेतली असून याबद्दल आरोग्य यंत्रणेनेचे कौतुक करीत अभिनंदन केले आहे.
दिवसाला 10 लाखापेक्षा अधिक लसीकरण केले जाऊ शकते हे आज आरोग्य विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सिद्ध केले असून याहीपेक्षा अधिक लसीकरणाची क्षमता राज्याची असल्याचे आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले. विभागाच्या वतीने त्यासाठी अधिक प्रयत्न करण्यात येतील असेही त्यांनी सांगितले.
कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत (Vaccination Record in Maharashtra) सायंकाळी सातपर्यंत 5200 लसीकरण केंद्रांच्या माध्यमातून 10 लाख 96 हजार 493 नागरिकांना लस देण्यात आली. रात्री उशिरापर्यंत आकडेवारीत वाढ होण्याची शक्यता, आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी वर्तविली आहे. काही दिवसांपूर्वी राज्यातील आतापर्यत दिलेल्या डोसेसची संख्या 5 कोटींवर गेली असून देशभऱात उत्तर प्रदेश पाठोपाठ महाराष्ट्राने ही विक्रमी कामगिरी केली आहे.
आज सायंकाळी सात वाजेपर्यंत दिवसभरात 10 लाख 96 हजार 493 नागरिकांचे लसीकरण झाले. यापूर्वी 3 जुलै रोजी 8 लाख 11 हजार नागरिकांना लस देऊन राज्याने विक्रमी कामगिरी नोंदविली होती त्यानंतर स्वातंत्र्यादिनाच्या पूर्वसंध्येला 9 लाख 64 हजार 460 नागरिकांना लस देऊन राज्याने आधीचा विक्रम मोडला. आजच्या सर्वोच्च संख्येने झालेल्या लसीकरणानंतर एक नवा विक्रम महाराष्ट्राच्या नावावर नोंदविल्याचे डॉ. व्यास यांनी सांगितले.